चिऊताई आणि भाताच्या लोंब्या

sparrow

आपल्याकडे दसऱ्याला दारावरच्या तोरणात भाताच्या लोंब्या लावायची प्रथा आहे. दसरा साजरा करून झाल्यावर बरेचदा, या लोंब्या निर्माल्यात किंवा कचऱ्यात टाकून दिल्या जातात. एका मित्राने व्हॉट्स-आप वर पाठवलेल्या पोस्ट वरून वाचनात आले की, या लोंब्या टाकून न देता, त्या खिडकीच्या जाळीवर बांधून ठेवाव्यात. चिमण्यांना हे खाद्य अतिशय प्रिय आहे. लहानपणी अगदी सहजपणे नेहमी दिसणारी, पंख्याच्या वाटीत छोटंसं घरटं करणारी, एक घास माझा असं म्हणवणारी चिऊताई आज शहरातून नाहीशी झाली आहे याची जाणीव गेली बरीच वर्षे होतीच. म्हटलं, बघूया करून प्रयोग. 
 
मग, आम्ही त्या लोंब्या खिडकीच्या जाळीवर लावून ठेवल्या. पहिले  ८-१० दिवस असेच गेले. एक दिवस, आम्ही नाश्ता करत असताना खिडकीबाहेर चिव-चिव ऐकू आली. सहज बघितले तर लोम्ब्यांवर कुणीच नव्हतं. बराच वेळ वाट पाहिली, तरीही चिऊताई नाही आली. पुन्हा काही दिवस तसेच गेले. 
 
काही दिवसांपूर्वी, चिव-चिव वाढलेली जाणवली. पण, त्या दिवशी नेमकी खिडकी बंद होती. शक्य तितका आवाज न करता ती उघडून बघतो तर भुर्र्र्कन सगळ्या चिऊताई उडून गेल्या. आम्ही पुन्हा वाट बघत बसलो. पण त्या दिवशी त्या आल्या नाहीत.
 
मग आम्ही थोडं दूर राहूनच निरीक्षण करायचं ठरवलं. त्या आल्या आहेत अशी जाणीव झाली की, आम्ही आमच्या हालचाली बंद करायचो. एकाच जागी बसून बघत राहायचो. चिऊताई आता रोज येऊ लागल्या. लोम्ब्यांवर बसून एकेक भाताचा दाणा सोलून खाऊ लागल्या. मध्येच काही दाणे खाली पडले की, भुर्र्र्कन खाली उडी मारायच्या आणि खालचे दाणे सोलून खायच्या. १०-१५ मिनिटे छान विरंगुळा होता. त्यांना न्याहाळत आम्ही आमचा नाश्ता करू लागलो. त्यांच्या वेळाही ठरलेल्या; सकाळी साधारण ९-१० आणि दुपार उलटून ४-५ च्या दरम्यान.
 
या चिमण्यांची मला गंमत अशासाठी वाटे की, त्या एकट्या-दुकट्या न येता, आपला छोटासा मित्रपरिवार घेऊन येत. ठराविक ८-१०च. लोंब्यावरचे दाणे खाताना त्यांच्यात खोडकरपणा चाले, पण भांडणं नाहीत. त्यांचं पोट भरेल इतके दाणे खाल्ले की, चिव-चिव करून एक-मेकींना निघायच्या खाणा-खुणा करून उडून जात. पारव्यांसारखा हावरटपणा त्यांच्यात नव्हता याचं मला विशेष वाटे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *